एरंडोल येथील वसंत कारखाना,अंजनी प्रकल्प,श्रीक्षेत्र पद्मालय बाबत केवळ निवडणूक पुरतेच आश्वासन.
प्रतिनिधी -एरंडोल विधानसभा मतदार संघातील बंद पडलेला वसंत सहकारी साखर कारखाना,अंजनी प्रकल्पाच्या वाढीव उंचीमध्ये बुडीत होणा-या गावांचे पुनर्वसन,ऐतिहासिक व धार्मिक महत्व असलेले श्रीक्षेत्र पद्मालय,फरकांडे येथील झुलता मनोरा,औद्योगिक वसाहत यासारख्या समस्या सोडविण्याबाबत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणा-या सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी केवळ आश्वासने देवून मतदारांची बोळवण केली आहे. निवडणुकीच्या प्रचारात समस्या सोडविण्याचे आश्वासने द्यायची आणि निवडणूक झाली की त्याकडे दुर्लक्ष करायचे असा अनुभव तीस वर्षांपासून मतदारांना येत आहे.
राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एरंडोल तालुक्यातील प्रमुख समस्यांकडे सर्वच उमेदवारांनी दुर्लक्ष केले आहे. वनकोठे येथील वसंत सहकारी साखर कारखाना सुमारे तीस वर्षांपासून बंद पडला आहे.१९९० पासून झालेल्या सर्व लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सर्वच उमेदवारांनी कारखाना सुरु करण्याबाबत आश्वासने देवून सभासद , ऊस उत्पादक शेतकरी,कामगार यांचे मते मिळवलीत मात्र निवडणुका होताच या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे . १९९९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार तथा विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वसंत कारखाना आणि अंजनी प्रकल्प या दोन प्रमुख समस्या प्राधान्याने सोडविण्याची घोषणा करून निवडणूक लढवली होती.मात्र दहा वर्ष मतदार संघाचे नेतृत्व केल्यानंतर देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कारकिर्दीत या दोन्ही समस्या सुटू शकल्या नाहीत.अंजनी प्रकल्पाचे वाढीव उंचीनुसार काम पूर्ण झाले आहे.मात्र वाढीव उंचीत बुडीत होणा-या तीन गावांचे पुनर्वसन अद्यापपर्यंत न झाल्याने प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा करण्यास अडचण निर्माण होत असते.वाढीव उंचीत बुडीत होणा-या तीनही गावांचे पुनर्वसन झाल्यास प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा होऊन एरंडोल आणि धरणगाव तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.१९९५ ते १९९९ पर्यंत अंजनी
प्रकल्पाचे वाढीव उंचीसह काम पूर्ण झाले आहे.मात्र सुमारे तीस वर्षांचा कालावधी उलटून देखील तीनही गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न न सुटल्यामुळे दरवर्षी अंजनी नदीच्या पात्रातून पाणी वाहून जात असते.विकासाचे स्वप्न दाखवून मतदारांची दिशाभूल न करता ते प्रत्यक्षात अंमलात आणण्याची राजकीय इच्छाशक्ती उमेदवारांनी दाखवण्याची गरज आहे.देशभरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पद्मालयच्या विकासाकडे देखील सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे.राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एरंडोल तालुका औद्योगिक वसाहती पासून दूरच आहे.औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून नवीन उद्योगधंदे सुरु झाल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.केंद्रसरकारच्या विविध योजनांपासून तालुका वंचित असल्याची भावना मतदारांमध्ये व्यक्त केली जात आहे.१९९१ पासून लोकसभा निवडणुकीत तालुक्यातून भाजपला आघाडी मिळत आहे.यावेळी महायुती आणि
महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये लढत होणार असल्यामुळे मतदार कोणाच्या पारड्यात मतांचे दान करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या अगोदर एरंडोल विधानसभा निवडणुकीत जर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले तर राज्यात भाजप – शिवसेना चे सरकार असायचे. आता तसे काही नाही. तरी विद्यमान आमदारांनी या बाबत लक्ष द्यावे अशी मागणी जनतेतून होत आहे.