लाचखोर महिला तलाठीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई .
विशेष (प्रतिनिधी)- पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे दिगर येथील रहिवाशी तक्रारदाराचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. गौण खनिजाची रॉयल्टी भरण्यासाठी २५ हजार रुपयाची मागणी केल्याप्रकरणी शिवरेदिगर (ता. पारोळा) येथील तलाठी वर्षा रमेश काकुस्ते यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे वीटभट्टी साठी त्यांना मातीची आवश्यकता असते. यामुळे मातीची वाहतूक करण्याकरता त्यांनी तलाठी वर्षा काकूस्ते यांची भेट घेऊन गौण खनिजाची रॉयल्टी भरण्याकरता तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपये जमा करून घेतले. त्यानंतर तक्रारदाराने गौण खनिज परवानाची चौकशी करण्यासाठी तलाठी वर्षा काकुस्ते यांची १२ डिसेंबर २०२३ ला भेट घेतली.
यावेळी त्यांनी तक्रारदाराकडे यापूर्वी दिलेल्या पैशाची पावती न देता त्या व्यतिरिक्त २५ हजाराची मागणी केली होती. दरम्यान सदर तक्रारीची १३ डिसेंबरला पडताळणी केली.पडताळणी दरम्यान तलाठी वर्षा रमेश काकुस्ते यांनी तलाठी कार्यालय मौजे शिवरेदिगर ता. पारोळा येथे त्याच दिवशी पुन्हा पारोळा येथील शासकीय निवासस्थानी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी करत सदर रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. चौकशीअंती यात सातत्य आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिला तलाठीस ताब्यात घेण्यात आले आहे.