एरंडोल शहरात वाजत गाजत रॅली काढून अमित पाटील यांनी दाखल केले नामांकन पत्र….!
प्रतिनिधी एरंडोल – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष अमित पाटील यांनी २४ ऑक्टोबर २०२४ रोजी गुरुवारी येथे सवाद्य मिरवणूक काढून दुपारी १२.५० वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात अपक्ष नामांकन पत्र दाखल केले.यावेळी उमेदवार अमित पाटील,गोरख चौधरी अरूण पाटील, संजय पाटील, बापू नांदगावकर, डॉ.सुरेश पाटील, शिवाजी पाटील,सुदाम पाटील, मुश्ताक खाटीक गुलाब खाटीक हे कार्यकर्ते उपस्थित होते.
गुरूवारी सकाळी कासोदा दरवाजा नजीकच्या श्रीराम मंदिरात अमित पाटील यांच्या हस्ते प्रभु रामचंद्राच्या मुर्तीचे पुजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर वाजत गाजत मिरवणूकीला प्रारंभ होऊन शहरातील विविध भागातून रॅली तहसील कार्यालयात पोहचली.वाटेवर पिर बाखरूम बोवा मशिदीत चादर चढविण्यात आली.तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व वीर एकलव्य यांच्या पुतळ्यांस पुष्पहार अर्पण करण्यात आले.रॅलीत कार्यकर्त्यांनी घोषणांनी शहर परिसर दुमदुमला.या रॅलीत महिलांची मोठी उपस्थिती होती.’ एकच वादा अमित दादा ‘ अशा घोषवाक्याच्या टोप्या सर्व कार्यकर्त्यांनी परिधान केल्या होत्या.ठिकठिकाणी अमित पाटील यांचे महिलांनी औक्षण केले.तसेच जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद व नागरिकांच्या शुभेच्छा अमित पाटील यांना देण्यात आल्या.एकंदरीत पाटील यांना विधानसभेच्या उमेदवारीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
या रॅलीत तालुक्यातील उत्राण,तळई, हनुमंतखेडे
सिम,धारागीर,विखरण,रिंगणगांव,अंतुर्ली बाम्हणे, भातखंडे,भातखेडे,गिरड,अमळदे, पारोळा शहरासह तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.