आमचे श्रद्धास्थान ” श्री क्षेत्र पद्मालयाचे गणपती “
एरंडोल – जळगाव जिल्ह्यातील एरंडोल जवळ असलेल्या पद्मालय येथील गणेश मंदिर अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ म्हणून प्रसिध्द आहे. येथे दर चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी होत असते. ‘पद्म’ म्हणजे कमळ आणि ‘आलय’ म्हणजे घर यावरून या ठिकाणाचे वैशिष्ट्य लक्षात येते. येथे वेगवेगळ्या प्रकारच्या कमळांमुळे असलेल्या पद्मालय या नावावरूनच या ठिकाणाची ओळख पटते.
दोन मूर्ती असलेले गणेशाचे हे कदाचित एकमेव मंदिर असावे. मंदिरातील या मूर्ती एक सहस्त्रअर्जुनाने आणि दुसरी श्रीशेषाने स्थापन केल्याचा उल्लेख श्रीगणेश पुराणातील उपासना खंडात आढळतो. या मूर्तींना श्रीप्रवाळ गणेश म्हणतात.
एरंडोलपासून सुमारे १२ किलोमीटरवर श्रीक्षेत्र पद्मालय आहे. मंदिराच्या गाभार्यात आमोद व प्रमोद अशा गणरायाच्या दोन मूर्ती आहेत. डाव्या व उजव्या सोंडेचे नवसाला पावणारे हे गणपती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. दोन मूर्ती असलेले गणेशाचे हे कदाचित एकमेव मंदिर असावे.
या मूर्तींना श्रीप्रवाळ गणेश म्हणतात. मंदिराच्या समोरील कमळाच्या तळ्यातून भाविकांना दर्शन देण्यासाठी या मूर्ती वर आल्याचा भक्तांचा समज आहे.
या गणेश मंदिराचे बांधकाम पुरातन असून ते कुणी बांधले याबाबतची माहिती अस्तित्वात नाही. मात्र, ते १२०० वर्षांपूर्वीचे असावे असा अंदाज आहे. मंदिराची सुमारे ३५ फूट उंच भिंत एका अखंड पाषाणातून उभारली आहे. कळसावर तसाच अवजड प्रचंड घुमट आहे. मंदिराच्या परिसरातील इतर वास्तूंचे बांधकामही काळ्या पाषाणातूनच केलेले आहे. मंदिरापासून खालील तळ्यापर्यंत याच दगडाच्या पायर्या आहेत.
मंदिरात सुमारे ११ मण वजनाची (४४० किलो) पंचधातूची अवाढव्य घंटा आहे. पद्मालयापासून २ किलोमिटरवर भीमकुंड आहे. येथे भीमाने बकासुराचा वध केल्याची आख्यायिका आहे. मंदिरात दरवर्षी कार्तिक पोर्णिमा, अंगारिका आणि संकष्टी चतुर्थीला भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते.