घोटाळा पोहचला 26 कोटींवर; नव्या माहितीनं खळबळ…
लातूर – येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेतील लिपिकाने विविध योजनांच्या सरकारी निधीतून केलेल्या घोटाळ्यात आता आणखी नवीन माहिती समोर येत आहे. ज्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. लातूर शासकीय कार्यालयाशी संबंधित दोन खात्यांतील 22 कोटी 87 लाख 62 हजार 25 रुपयांच्या रकमेचा अपहार झाल्याची माहिती समोर आली मात्र पुढे सुरू असलेल्या तपासात रक्कमेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तर 22 कोटींचा आकडा आता 26 कोटींच्या घरात गेलेला आहे. तर या घोटाळ्याची लातूर जिल्ह्याभरात चर्चा होत आहे.
हा प्रकार जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निधी वितरणाचा आदेश काढल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तहसीलदार महेश मुकुंद परांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. लिपिक मनोज नागनाथ फुलेबोयणे यांच्यासह अरुण नागनाथ फुलेबोयणे, सुधीर रामराव देवकते, चंद्रकांत नारायण गोगडे यांच्याविरोधात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.