राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण, येवला व दिंडोरी विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे बनावट दारूचे बिंग फुटले.
नाशिक – दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे बनावट मद्यसाठा असल्याचे राज्य उत्पादन शुल्कला समजले. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्कचे मुंबईचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, नाशिकचे विभागीय उप आयुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक शशिकांत वि. गर्जे, उप अधीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण विभाग, येवला विभाग व दिंडोरी भरारी पथकाने सोमवारी (दि. ३०) लखमापूर येथील कोशिंबे शिवारातील हॉटेल कोकणी दरबारमध्ये बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त केला.
यामध्ये संशयित आरोपी साईनाथ भारत जाधव यास अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान मिळालेला बनावट मद्यसाठा हा निफाड येथील प्रवीण वडघुले या व्यक्तीने दिल्याचे समोर आले. त्यानुसार मंगळवारी ३१ जानेवारी २०२३ रोजी निफाड- पिंपळगांव रोडवरील कुंदेवाडी शिवारात सदरील व्यक्ती बनावट मद्यसाठा देण्याकरीता येत असतांना जप्त बनावट मद्यसाठ्याप्रमाणे पुन्हा त्याच बॅच क्रमांकाचा बनावट विदेशी मद्यसाठा व वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे चारचाकी वाहन मिळून आले. वाहनासोबत प्रवीण उत्तमराव वडघुले मिळून आल्याने त्यास अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत मद्याने भरलेल्या व बनावट लेबल लावलेल्या ऑफिसर चॉईस ब्लु व्हिस्की १८० मि.ली. क्षमतेच्या एकुण ५१७ सिलबंद बाटल्या (११ बॉक्स) किंमत ७७,५५० व एक चारचाकी वाहन (क्र.एमएच-१५-ईएक्स- ४७७४) किंमत रूपये ५ लाख, तसेच एक मोबाईल किंमत रूपये एक हजार असा एकूण ५ लाख ७८ हजार ५५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई निरीक्षक एस. के. सहस्त्रबुध्दे, व्ही. ओ. चौरे, दुय्यम निरीक्षक एस. आर. वाकचौरे, एस. व्ही. देशमुख, सहाय्यक दुय्यम निरीक्षक व्ही. व्ही. डांगे, जवान दीपक आव्हाड, विलास कुवर, एम. सी. सातपुते, पी. एम. वायकर व्ही. आर. सानप, ए. व्ही. पाटील, वाय. डी. साळवे, नवनाथ साताळकर, अनिल जाधव, एम.आय. तडवी, एस. एम. भांगरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. गुन्ह्याचा तपास निरीक्षक एस.के. सहस्त्रबुध्दे करीत आहे.