राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या आयुक्तांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन…
जळगाव :- महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागीय आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी धरणगांव तालुक्यातील पथराड गावातील शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायद्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. विभागीय आयुक्त श्रीमती कुलकर्णी या तीन दिवसीय जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. तसेच विविध ठिकाणी कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शनही केले.
यावेळी श्रीमती कुलकर्णी यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगांव कार्यालयाची तपासणी केली. कृषि विभागामार्फत देण्यात येणाऱ्या ऑनलाईन व ऑफलाईन सेवांचा आढावा घेतला. याबाबत संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगांव यांनी योजनांचे सादरीकरण करून जिल्हास्तरावर देण्यात येणारे कृषि निविष्ठा परवान्यांची सद्य:स्थितीची माहिती दिली. परवान्यांचे सर्वाधिक अर्ज राज्यात जळगांव जिल्हयात प्राप्त असून कार्यालयाकडून युद्ध पातळीवर त्यांचा निपटारा करण्यात येत असल्याबाबत आयुक्त श्रीमती कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केले.
तसेच पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 च्या पोस्टर्सचे विमोचन आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले. अनिल भोकरे, कृषि उपसंचालक यांनी जिल्ह्यात कृषि विभागामार्फत शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवा पिएमएफई, महाडीबीटी बाबत व पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 साजरे करण्याबाबत कृषि विभागामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी आयुक्त श्रीमती कुलकर्णी यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये खाजगी संस्थाचा सीएसआर निधी मोठ्या प्रमाणात वापरल्यामुळे कृषि विभागाचे कौतुक केले. तसेच या उपक्रमांमध्ये युवकांचा सहभाग घेण्याच्या सुचनाही दिल्यात. असे संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.