महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियानाची सांगता दत्तक गांव विखरण येथे महिला आरोग्य शिबिराने झाली.
एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील विखरण येथे दि. 4 मार्च 2023 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग व य. च. शि. प्र. मंडळाचे दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय एरंडोल युवती सभा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने चालविलेल्या महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियानाची सांगता दत्तक गांव विखरण येथे महिला आरोग्य शिबिराने झाली.
शिबिराचे उद्घाटन नव निर्वाचित नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. अमितदादा पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. महिला कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेतात पण स्वतः मात्र आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण घरातील महिला आजारी पडले तर संपूर्ण कुटुंब आजारी पडते. त्यामुळे महाविद्यालयाने खूप स्तुत्य अभियान हाती घेतले आहे. असे मत मा. श्री. सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले. महिला या कुटुंबाचा आणि समाजाचा कणा असतात त्यामुळे घरातील महिला निरोगी असेल तर कुटुंब आणि पर्यायाने समाज सुदृढ असेल असे मत अमितदादा पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. अनिल पाटील यांनीही आपल्या भाषणातून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते उपस्थित महिलांना कॅल्शियम व लोह वाढीसाठीच्या औषधींचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विखरण गावाच्या सरपंच मा. सौ. नम्रता गायकवाड, पोलीस पाटील विनायक पाटील, डॉ. राजेंद्र देसले, डॉ. योगीराज पळशीकर, सौ. रेखा महाजन, सौ. वैशाली देसले, सौ. मंजुषा पाटील, राजेंद्र शिंदे, माजी सरपंच जयंत महाजन, उमेश देसले, ,माजी प्रभारी प्राचार्य प्रा. एन. ए. पाटील, उप प्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर, डॉ. हेमंत पाटील हे उपस्थित होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग व य. च. शि. प्र. मंडळाचे दादासाहेब दिगंबर शंकर पाटील युवती सभा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी ऋतुमती अभियान राबविले गेले. या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्यविषयक समस्या जसे अनेमिया, हिमोगलोबिनची कमतरता, मासिक पाळीविषयीच्या समस्या यांचे सर्वेक्षण करून शोध घेणे हा होता. यासाठी एक प्रश्नावली तयार करून विखरण गावातील १९५ महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष काढले गेले.त्यात असे दिसून आले की येथील महिलांमध्ये अनेमिया, मासिक पाळी संबंधित येणाऱ्या समस्या आणि पी सी यू डी संबंधित समस्या दिसून आल्या. निष्कर्षाला अनुसरून मुख्य समस्या व त्याची मुख्य कारणे, उपचार तसेच घ्यावयाची काळजी यावर आधारित तज्ञ डॉक्टर यांचे मार्गदर्शन दुसऱ्या सत्रात आयोजित केले गेले.
शिबिराच्या दुसऱ्या सत्रात महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांवर तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. सर्वप्रथम डॉ. आसावरी पाटील यांनी मासिक पाळी विषयी समस्यांवर सखोल व महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. गीतांजली ठाकूर यांनी गावातील महिलांची प्रमुख समस्या म्हणजे अनेमिया या समस्येवर प्रकाश टाकला व हिमोग्लोबिन वाढीसाठी सकस आहार व व्यायाम किती आवश्यक आहे याचे महत्व पटवून दिले . त्यांनी सुचविले की आपल्या जीवनातील महत्वाच्या दिवशी जसे वाढदिवशी किवा लग्नाच्या वाढदिवशी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी. प्रत्येक आई आपल्या वयात आलेल्या मुलीला तिच्या आरोग्यविषयक कोण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे शिकविले पाहिजे असे ही त्यांनी सांगितले. डॉ. राजेंद्र देसले हे या सत्राच्या अध्यक्ष स्थानी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रेखा साळुंखे व आभार डॉ. स्वाती शेलार यांनी मानले. डॉ. सचिन पाटील यांनी सूत्र संचलन केले.