अनैतिक संबंध मुलाने पाहून घेतल्याने त्याचे तुकडे तुकडे करून त्याचा खून केला..
अमळनेर : भाच्याशी असलेले अनैतिक संबंध मुलाने पाहून घेतल्याने त्याचे तुकडे तुकडे करून त्याचा खून करणाऱ्या चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील आई व तिच्या भाच्याला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
चहार्डी येथील दगडू लोटन पाटील याने २ फेब्रुवारी २०१९ रोजी त्याचा मुलगा मंगेश दगडू पाटील वय १३ वर्षे ८ महिने हा संडासला जातो असे सांगून घरून गेला होता तो आलाच नाही. म्हणून चोपडा शहर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. ५ फेब्रुवारी २०१९ रोजी मुलाच्या अंगावरील कपडे ,चप्पल , संडासचा डबा आणि रक्ताने माखलेले कपडे ,उजव्या पायाचा गुडघ्याखालील पाय व हाड असे आढळून आले. त्यावेळी काही साधू आले होते व हा नरबळी असल्याचा प्रकार असल्याची दिशाभूल मुलाची आई गीताबाई दगडू पाटील (वय ३५) व तिचा भाचा संभा उर्फ समाधान विलास पाटील (वय २५) यांनी केल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून घेतला होता. प्रथम घटनेचा तपास सहा पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी केला होता.पोलिसांनी चॅम्प नावाचे श्वान मागवला असता श्वानने हाड पडलेल्या जागेपासून ते समाधान आणि गीताबाई यांच्या घरापर्यत मार्ग दाखवला होता. म्हणून पोलिसांचा संशय बळावला होता. मात्र आई असे करू शकेल का ? आणि मुलाच्या शरिराचे अवयव सापडलेले नसल्याने खात्री होत नव्हती. तपास पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी गीताबाई आणि समाधान यांची स्वतंत्र चौकशी करून खाक्या दाखवला असता दोघांनी कबुली दिली की, २ फेब्रुवारी २०१९ रोजी गीताबाई व समाधान अनैतिक संबंध करीत असताना मंगेश याला दिसून आल्याने मंगेशने ही बाब मी वडिलांना सांगेल असे सांगितले. त्याचक्षणी गीताबाईने त्याच्या डोक्यात काठीने तीन चार वार केले. तो बेशुद्ध झाला. समाधान ने त्याच्या तोंडात बोळा कोंबून त्याला गोणीत घालून ठेवले होते. रात्री गीताबाई समाधान च्या घरी आली. तेथे त्यांनी दोघांनी मंगेश चे कपडे काढून त्याच्या शरीराचे कुर्हाड ,चाकु व विळ्याने तुकडे तुकडे केले व गोणीत भरून त्याची विल्हेवाट लावली. मात्र त्यातील उजवा पायाचा पंजा सह तुकडा , पाचव्या बरगडीचे हाड आणि अंगावरील कपडे घरी काढून ठेवले. नंतर तो तुटलेला पाय ,हाडे ,कपडे हे नाल्यात फेकून तेथे कुंकू आणि कोयता ठेवून तो नरबळी दाखवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी २६ रोजी गीताबाई व समाधान याना अटक केली होती.
हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश पी आर चौधरी यांच्या न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील किशोर बागुल यांनी १५ साक्षीदार तपासले. त्यात न्यायालयाने डी एन ए अहवाल , डॉ स्वप्नील कळसकर,डॉ निलेश देवराज ,कुलदीप पाटील ,तपासाधिकारी योगेश तांदळे , श्वान पथकाचे विनोद चव्हाण यांची साक्ष ग्राह्य धरून गीताबाई व समाधान याना कलम ३०२ प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच कलम २०१ प्रमाणे पुरावा नष्ट केला म्हणून दोन वर्षांची शिक्षा दिली. आरोपीना अटक केली तेव्हापासून ते जिल्हा कारागृहात होते. आरोपीना त्यांची बाजू मांडण्यासाठी न्यायालयाने वकील दिला होता म्हणून त्यांना फक्त ३०० रुपये दंड दिला आहे.