शेतकऱ्यावर अस्मानी संकटाच्या मोठा फटका..
प्रतिनिधी- जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस पडला तर काही ठिकाणी गाराही पडल्याने अनेक ठिकाणी गहू, हरभरा, मका, द्राक्ष यांचे नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे जातो का काय अशी स्थिती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.जिल्ह्यात बुधवार गुरुवार शुक्रवार तसेच शनिवारी विविध भागांत कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेला गहू, हरभरा, कांदा पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर शनिवारी परिसरात विजांसह गारांचा पाऊस झाल्याने त्याचा अंजीर, सीताफळ बागांना सर्वाधिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
तर गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने या वातावरणाची बळीराजाने धास्ती घेतली आहे. जिल्ह्यात अनेक भागात गहू सोंगणीला आलेला असताना हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतलेला आहे. तर उन्हाळ कांद्याची काढणी सुरू झाली असून या पावसाचा या कांद्यालाही मोठा फटका बसलेला आहे. गहू, हरभरा, मका, हे सोंगणीला आलेले पीक पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.