फूस लावून अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला परप्रांतातून केले जेरबंद…..!

IMG-20230604-WA0127.jpg


तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पो. उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या सहकाऱ्यांची यशस्वी कामगिरी.

एरंडोल :- अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कोणताही पुरावा नसतांना अत्याधुनिक माहिती व तंत्रज्ञानाच्या व मोबाईलच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या सहका-यांनी अल्पवयीन मुलीसह आरोपीस राजस्थानमधून ताब्यात घेतले. तीन महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या सहका-यांनी मोबाईलवरून लोकेशन काढून राजस्थान पोलिसांच्या सहकार्याने आरोपीस ताब्यात घेतल्यामुळे त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, कि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी वडिलांना भेटण्यासाठी पिंपळकोठा येथे आली होती. वडिलांना भेटल्यानंतर अल्पवयीन मुलगी पुन्हा सावळदबारा (ता. सोयगाव) येथे जाण्यासाठी एरंडोल बसस्थानकावर वडिलांसह आली होती. वडिलांनी तिला बसमध्ये बसवले मात्र सदर मुलगी सावळदबारा येथे पोहोचलीच नाही. मुलीच्या आईने पतीला फोन करून मुलगी आली नसल्याचे सांगितले.नातेवाईक व परिसरात तिचा शोध घेतला असता ती आढळून न आल्यामुळे तिला अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार एरंडोल पोलीस स्थानकात देण्यात आली.
कोणताही पुरावा अथवा धागेदोरे नसताना अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते. पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या सहका-यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने अल्पवयीन मुलीचा तपास सुरु केला. उपनिरीक्षक शरद बागल व त्यांचे सहकारी हवालदार काशिनाथ पाटील, राजेश पाटील, पंकज पाटील यांनी एरंडोल बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.त्यामध्ये सदर अल्पवयीन मुलगी बसमध्ये चढत असल्याचे दिसून आले. अल्पवयीन मुलगी बसमध्ये चढत असल्याच्या व्यतिरिक्त कोणताही पुरावा उपलब्ध होत नसल्यामुळे उपनिरीक्षक शरद बागल यांनी त्यादिवशी बसस्थानकावर असलेल्या किती प्रवाशांचे मोबाईल सुरु होते याची माहिती काढली. मोबाईल सुरु असल्याची माहिती काढल्यानंतर त्यातील सुमारे सातशे ते आठशे मोबाईलची सविस्तर माहीती घेतल्यानंतर दहा ते बारा मोबाईल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलीस पथकाने मिळवली.दहा ते बारा मोबाईलपैकी एक मोबाईल बंद असल्याचे पथकाच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सातत्याने बंद मोबाईलचे लोकेशन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाईल बंद असल्यामुळे पोलीस पथकाने सदर मोबाईलवर सातत्याने संपर्क साधला अखेर एके दिवशी सदर मोबाईल सुरु असतांना त्याचे लोकेशन राजस्थानमध्ये असल्याचे मिळाले. राजस्थानचे लोकेशन मिळाल्यानंतर उपनिरीक्षक शरद बागल व त्यांचे सहकारी काशिनाथ पाटील, राजेश पाटील व पंकज पाटील हे तातडीने राजस्थानमध्ये रवाना झाले.
राजस्थानमधील बोरोनाडा येथील पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस पथकाने केला. तीन दिवस सातत्याने प्रयत्न केल्यानंतर उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या सहका-यांनी राजस्थान पोलिसांच्या मदतीने अल्पवयीन मुलीस पळवून नेणा-या राजू नामदेव घुमणार वय-४० यास व अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले.सदर अल्पवयीन मुलीस बाल निरीक्षण गृहात रवाना करण्यात आले असून राजू घुमणार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राजू घुमणार यास न्यायालयासमोर उभे केले असता त्यास चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले.
पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद बागल व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत. अल्पवयीन मुलीस पळवून नेणा-या आरोपीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसतांना उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या सहका-यांनी केवळ मोबाईलच्या लोकेशनवरून आणि सातत्याने प्रयत्न करून आरोपीस अटक केली. पोलीस पथकाच्या यशस्वी कारवाईबाबत नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!