लग्नाच्या दिवशीच नवरी प्रियकरासोबत फरार
लखनऊ- लग्न म्हटलं कि प्रत्येका माणसाला आपल्या लग्नाचा दिवस अतिशय खास असतो. मात्र लग्नाच्या दिवशीच नवरी प्रियकरासोबत फरार झाली तर? उत्तर प्रदेशातील बांदा येथील एका घरात लग्नसमारंभ सुरू असताना वरात येण्याच्या दिवशीच नववधू प्रियकरासह पळून गेली.जेव्हा वधूच्या नातेवाईकांना हे कळालं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. यानंतर वधूच्या वडिलांनी आपल्या लहान मुलीचं त्याच नवरदेवासोबत लग्न लावून दिलं. वडिलांनी वधूच्या प्रियकराच्या विरोधात तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण तिंदवारी पोलीस ठाण्यातील एका गावाशी संबंधित आहे.
येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, त्याच्या मुलीचं लग्न 8 जून रोजी होतं. ही वरात कन्नौज जिल्ह्यातून येणार होती. त्याचवेळी गावातील एका तरुणाने नवरीला फूस लावून पळवून नेलं. नवरीच्या वडिलांनी तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.जेव्हा वरात वधूच्या दारात पोहोचली तेव्हा समजलं की वधू तिच्या प्रियकरासह पळून गेली आहे. यानंतर वधूच्या वडिलांनी आपल्या धाकट्या मुलीचं लग्न याच मंडपात वरासोबत करण्याचा निर्णय घेतला. वधूच्या वडिलांनी वराशी बोलून धाकट्या मुलीसोबत लग्नाचे विधी करायला लावले. विवाह सोहळ्यात वरातीचे स्वागत केल्यानंतर धाकट्या मुलीला निरोप देण्यात आला.
या प्रकरणाबाबत स्टेशन प्रभारी अनिल कुमार यांनी सांगितलं की, गावातील तरुणाने आमिष दाखवून एका मुलीला पळवून नेल्याची तक्रार आली आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आली आहे.