मेरी माटी मेरा देश” अभियान जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर यशस्वीपणे राबविण्यात येणार.
जळगांव :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” अभियानाने सारा देश देशभक्तीने जागा झाला. या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या 15 ऑगस्ट 2023 रोजी होत आहे. याचे औचित्य साधून यावर्षी “मेरी माटी मेरा देश” या संकल्पनेला जनमाणसापर्यंत विविध उपक्रमाच्या माध्यमातून पोहोचविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यानुसार महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार “मेरी माटी मेरा देश” जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर यशस्वीपणे राबविण्याचे नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित व इतर शासकीय विभागाच्या समन्वयातून हा उपक्रम अधिक व्यापक करण्यावर भर दिला जात आहे. या अभियानातर्गंत जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत शिलाफलक उभारण्याचे येणार आहेत. ज्या व्यक्तींनी निस्वार्थपणे देशाची सेवा केली आहे व ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. या अभियानात देशाचा स्वाभिमान जपण्यासमवेत नागरिक म्हणून आपली कर्तव्य भावना व जागरूकता वृद्धींगत व्हावी यासाठी पंच प्रण प्रतिज्ञा गावोगावी घेतली जाणार आहे.
ज्यांनी निस्वार्थपणे देशाची सेवा करून आपले बलिदान दिले त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता स्वातंत्र्य सैनिक, सेवानिवृत्त संरक्षण कर्मचारी, केंद्रीय शसस्त्र पोलीस दलाचे कर्मचारी, राज्य पोलीस दलाचे कर्मचारी यांना याअंतर्गत सन्मानित करून कृतज्ञता व्यक्त केली जाईल. तसेच या अभियानात पुढील पिढ्यांसाठी साक्षीदार ठरतील अशी दीर्घकाळ टिकणारी 75 झाडांचे वृक्षारोपन करून एक वेगळा संदेश गावोगावी दिला जाणार आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नित्यराजशिष्टाचाराप्रमाणे गावोगावी ध्वजारोहण व राष्ट्रगान गायले जाईल. प्रत्येक गावातील माती एका कलशातून एकत्र करून ती राजधानी दिल्ली येथे कर्तव्यपथावर अमृतवाटिकेसाठी पाठविण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील मुठभर मातीतून हा अखंडतेचा संदेश यातून रुजला जाईल. 27 ते 30 ऑगस्ट या कालावधीत हा कलश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी तालुकास्तरावरील प्रथीतयश युवकाच्या हस्ते पाठविण्यात येणार आहे.