एरंडोल तालुक्यातील सोनबर्डी येथील पुनर्वसनासंदर्भात जळगांव येथे बैठक.
प्रतिनिधी एरंडोल – तालुक्यातील मौजे सोनबर्डी येथील पुनर्वसनासंदर्भात जळगांव येथे
राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री ना.अनिलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार चिमणरावजी पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वपुर्ण बैठक पार पडली. यावेळी आमदार चिमणरावजी पाटील यांनी सदरील पुनर्वसना संदर्भातली पार्श्वभूमी मा.मंत्री महोदयांचा लक्षात आणुन दिली. तसेच यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी पुनर्वसनाअभावीच्या समस्या मंत्री महोदयांना सांगितल्या. त्यावर मा.मंत्री महोदयांनी याबाबत जिल्ह्याचे मदत व पुनर्वसन अधिकारी यांचेशी संपर्क करून सदर प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याचा सुचना दिल्या. तसेच यासमयी आमदार चिमणरावजी पाटील यांनी सदरील प्रस्तावासंदर्भात तातडीने कार्यवाही होणेसाठी मंत्रालय, मुंबई येथे बैठकीचे आयोजन करून त्रुटींसह आवश्यक त्या बाबी त्वरीत पुर्ण करण्यात येवुन या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा करावा असे मा.मंत्री महोदयांना सुचित केले. त्यावर मा.मंत्री महोदयांनी याची दखल घेत लवकरच बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येईल असे यावेळी आश्वासित केले.