जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध..
प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यात सध्या खतांचा १ लाख २२ हजार ८७२ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. मुख्य खत युरियाचा २२ हजार १३२ मेट्रिक टन साठा आहे. पुढील आठवड्यात इफ्को व कृभको कंपनीचा ५२०० मेट्रिक टन युरीया खताचा पुरवठा होणार आहे. खतांचा जिल्ह्यात मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खते भरुन न ठेवता, जसे लागतील तसे खतांची खरेदी करावी. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. संभाजी ठाकूर व जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी सुरज जगताप यांनी केले आहे
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत युरिया खतांच्या टंचाईचा मुद्दा उपस्थित झाला होता. यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लवकरच खत उपलब्धतेचा आढावा घेऊन युरिया खताचे पुर्नवितरण करण्याच्या कृषी विभाग व जिल्हा परिषद विभागास सूचना दिल्या होत्या. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील खतांचे पुर्नवितरण करण्यात आले आहे.
एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत आवश्यकते प्रमाणे दरमहा पुरवठा करण्यात येत असतो. जिल्ह्यात आज रोजी २ लाख ४३ हजार १०३ मे. टन खतांचा पुरवठा करण्यात आलेला असुन मुख्य खत युरियाचा ७६ हजार ६९९ मे.टन पुरवठा झालेला आहे. २२ ऑगस्ट रोजी आरसीएफ कंपनीमार्फत ३००० मे.टन व एनएफएल कंपनीचा २६०० मे.टन युरिया पुरवठा करण्यात आलेला असून, पुढील आठवड्यात इफ्को कंपनीचा २६०० मे.टन युरीया खताचा व कृभको कंपनीचा २६०० मे.टन युरिया खतांच्या पुरवठा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खत भरुन न ठेवता, जसे लागतील तसे खतांची खरेदी करावी. युरीया, एसएसपी व पोटॅश या मुलभूत खतांचा वापर करुन देखील घरच्या घरी मिश्र खते बनवता येतील. बियाणे व खत खरेदी करतांना जिल्ह्यातील अधिकृत वितरक यांचेकडूनच खरेदी करावे. विक्रेत्यांकडून बील अवश्य घ्यावे. असे आवाहन ही श्री.ठाकूर व श्री.जगताप यांनी केले आहे.