मुख्याधिकारी व ठेकेदार यांच्या आश्वासनानंतर ज्येष्ठ नागरिकांचे उपोषण मागे.
प्रतिनिधी – एरंडोल येथील नवीन वसाहतीतील रहिवासी ज्येष्ठ नागरिक नामदेव धुडकू पाटील यांनी एरंडोल नगरपालिकेला नवीन वसाहतीतील रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशा बाबत निवेदन देऊन आमरण उपोषण करण्याचे सांगितले होते.त्या अनुषंगाने एरंडोल नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे व ठेकेदार आनंद दाभाडे यांच्या आश्वासनाने सदर उपोषण मागे घेण्यात आले असल्याचे गजानन पाटील यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की एरंडोल नगरपालिकेतर्फे नवीन वसाहतींमध्ये नुकतेच नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकल्याने रस्ते खराब झाले होते.त्यात सततच्या पावसामुळे सगळीकडे चिखल झालेला होता व या चिखलातून नवीन वसाहतीतील रहिवाशांना पायी चालणे देखील मुश्किल झाले होते.यातच स्वतः ज्येष्ठ नागरिक नामदेव पाटील व त्यांच्या धर्मपत्नी यासुद्धा दुचाकीवरून पडल्याने त्यांना मुका मार लागला होता. यामुळे नवीन वसाहती मधील नागरिकांनी एरंडोल नगरपालिकेस निवेदन देऊन दिनांक ११ सप्टेंबर २०२३पर्यंत रस्ते दुरुस्त न केल्यास आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता.त्यामुळे आज दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी मुख्य अधिकारी विकास नवाळे व ठेकेदार आनंद दाभाडे यांनी तत्पर आश्वासन देऊन लागलीच मुरूम व कच टाकण्याच्या कामाला सुरुवात केली असल्याने नामदेव पाटील यांनी उपोषण मागे घेतले असल्याचे सांगितले.