एरंडोलचे माजी नगराध्यक्ष देविदास महाजन यांची खासदारांशी चर्चा..
प्रतिनिधी एरंडोल – येथील राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या अमळनेर नाक्याजवळ वाहनधारकांना जाण्या येण्यासाठी व्हेईकल अंडर बायपास द्यावा तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूस बंद पडलेले समांतर रस्त्याचे काम पूर्ण करावे आदी महामार्गाच्या संबंधित नागरिकांच्या प्रश्नांबाबत माजी नगराध्यक्ष देविदास महाजन यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील यांच्याशी चर्चा केली असून या संदर्भात नहीच्या अधिकार्यांशी बोलून लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन खासदार पाटील यांनी महाजन यांना दिले आहे.
एरंडोल शहरालगत सध्या चौपदरीकरणासह उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असून बहुअंशी काम पूर्ण झाले आहे परंतु बस स्थानकाकडील समांतर रस्त्याचे काम फक्त तिवारी व्यापारी संकुलापर्यंतच करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पुढे हे काम बंद पडण्यामागे काही राजकारण तर नाही ना ? याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. तर महामार्गाच्या दोन्ही बाजूस समांतर रस्ते होणे वाहनधारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे असताना याबाबत नहीचे अधिकारी केवळ चालढकल करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मात्र देर से आये दुरुस्त आये या उक्तीप्रमाणे आठ दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महामार्ग सुरळीत सुरू झाल्यामुळे शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. माजी नगराध्यक्ष देविदास महाजन यांनी खासदारांशी चर्चा केली असता खासदारांनी देखील महाजन यांना यासंदर्भात नहीच्या अधिकार्यांसोबत स्पॉट निरीक्षण करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजपचे सरचिटणीस निलेश परदेशी, किरण तोतले, सुभाष पाटील, पंडीत साळी, संजय मानुधने आदी उपस्थित होते.