ठेकेदार व अभियंत्याच्या हलगर्जीपणामुळे १० वर्षीय बालकाच्या छातीत सळई घुसून मृत्यू झाल्याची तक्रार.
ऐन दिवाळीत आदिवासी कुटुंबावर दुख्खाचा डोंगर.
प्रतिनिधी एरंडोल — एरंडोल येथे दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता च्या सुमारास दहा वर्षाच्या बालकाचा गटारीवर असलेल्या मोकळ्या आसारीवर पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली असुन संबंधित कामा वरील ठेकेदार व अभियंता विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.ऐन दिवाळीत आदिवासी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की एरंडोल येथील जुना धरणगाव रस्त्याला लागून आदिवासी भिल्ल वस्ती आहे. त्या परिसरा समोर असलेल्या नवीन वसाहतीत नगरपालिकेकडून गटारीचे काम सुरू आहे.हे काम गेल्या सात ते आठ महिन्यापासून चालू आहे.या ठिकाणी दि.१३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी विलास रवींद्र गायकवाड वय (१०) हा बालक खेळत असतांना तो अचानक गटारीवर पडल्याने गटारीवरील असारीचा बार विलासच्या डाव्या छातीत घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.सदर घटना विलासच्या परिवाराला कळल्यावर त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली व आक्रोश केला.सदर बालकाला तात्काळ शहरातील खाजगी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.याच विषयाशी निगडीत याच गटारीत बैल पडून जखमी झाल्याची घटना देखील काही दिवसांपूर्वी घडली असल्याचे रहिवाशांनी सांगितले.गेल्या काही महिन्यात या ठिकाणी छोटे मोठे अपघात घडून नागरिकांना दुखापत झाली असल्याची चर्चा आहे.याबाबत परिसरातील नागरिकांनी नगर पालिकेस निवेदन देखील दिले आहे तरी देखील नगर पालिका व संबंधित ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान एरंडोल पोलीस स्टेशनला सदर गटारीच्या बांधकामावरील ठेकेदार व अभियंता विरोधात मुलाचे वडील रविंद्र भिल यांनी तक्रार दाखल केली असुन पुढील तपास एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिष गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत.