एरंडोलला नपा-तहसिल कार्यालयात दिव्यांग दिवस साजरा न केल्याने नाराजी
दरवर्षी जागतिक दिव्यांग दिवस साजरा करावा-प्रहार अपंग क्रांती संस्थेची मागणी
एरंडोल – येथील न.पा. आणि तहसिल कार्यालयात जागतिक दिव्यांग दिवस साजरा न केला गेल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच दरवर्षी शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे जागतिक दिवस साजरा करण्यात यावा अशी मागणी देखील प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकार प्रहार अपंग क्रांती संस्थेतर्फे करण्यात आली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, सालाबादाप्रमाणे जागतिक दिव्यांग दिवस शासकीय कार्यालयांमध्ये सर्वत्र साजरा होत असताना एरंडोल नगरपालिका आणि तहसिल कार्यालयामध्ये हा दिवस का साजरा करण्यात येत नाही ? असा संतप्त सवाल प्रहार अपंग (दिव्यांग) क्रांती संस्था शाखा एरंडोल तर्फे करण्यात आला आहे. मागील वर्षी सन 2022-2023 ला प्रहार अपंग क्रांती संस्थेतर्फे नगरपालिकेस जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्याची आठवण दिल्यानेच त्यानुसार कार्यक्रम घेण्यात आला. परंतू यंदा मात्र संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये जागतिक दिव्यांग दिन साजरा होत असताना न.पा.ने मात्र साजरा केला नाही म्हणा की दुर्लक्ष केले म्हणा… त्यांना आठवण पडली की काय ? असा देखील सवाल संस्थेतर्फे उपस्थित केला जात आहे. तहसिल कार्यालयाने देखील जागतिक दिव्यांग दिन साजरा करणे अपेक्षित होते मात्र त्यांनी देखील गेल्या दोन वर्षांपासून हा दिवस साजरा केला नाही त्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये नाराजीचा सुर उमटला आहे. तरी दरवर्षी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात यावा अशी मागणी प्रहार अपंग (दिव्यांग) संस्थेतर्फे करण्यात आली आहे.