ट्रॅक्टर चोरी प्रकरणी एकास अटक,दुसरा फरार,ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त..!
प्रतिनिधी एरंडोल: तालुक्यातील पळासदळ येथे घरासमोर उभे असलेले ट्रॅक्टर व ट्रॉली घेऊन पोबारा केलेल्या चोरट्यास पोलीसांनी अटक करून त्याच्याकडून ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त केली आहे. त्याचा दुसरा साथीदार हा फरार आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयिताकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पळासदळ येथील लोटन बाळकृष्ण पटवारी हे २ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता एरंडोल येथे परिवारासह आपल्या घरी आले असता त्यांनी त्यांच्या पळासदळ येथील घरासमोर महिंद्रा कंपनी चे ट्रॅक्टर व ट्रॉली उभे केले होते.
३ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजता पटवारी हे आपल्या गायींचे दूध काढण्यासाठी पळासदळ येथे आले असता त्यांना आपल्या घरासमोरील उभे केलेले ट्रॅक्टर व ट्रॉली आढळुन आले नाही. त्यांनी ट्रॅक्टर व ट्रॉली बाबत गावात सर्वत्र व आजुबाजूच्या परिसरात विचारणा केली व शोध घेतला असता त्यांना आपले ट्रॅक्टर व ट्रॉली कुठेही मिळून आले नाही.
पटवारी यांनी याबाबत एरंडोल पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, विकास देशमुख व पो.हे काँ.अनिल पाटील, संदिप पाटील, अकील मुजावर यांनी करून पळासदळ येथीलच रविंद्र राजू ठाकरे या संशयितास ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याच्या कडून ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण साडेचार लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
संशयित रविंद्र ठाकरे याचा एक साथीदार फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. रविंद्र ठाकरे यास न्यायालयासमोर उभे केले असता त्यास दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधिशांनी दिले.
दरम्यान,
ट्रॅक्टर व ट्रॉली चोरी प्रकरणातील संशयितास पोलीसांनी अटक केल्यामुळे त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने या प्रकरणात आणखी किती जणांचा समावेश आहे..? या प्रकरणी मूळ सूत्रधार कोण याचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.