सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,संचलित व्यंगचित्रकला संग्रहालयाचा दुसरा वर्धापनदिन उत्साहात साजरा.
विशप्रतिनिधी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यंगचित्रकला संग्रहालयाने ९ मार्च २०२४ रोजी शनिवारी दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने व्यंगचित्र प्रदर्शन सोहळ्यासाठी पुण्यातील व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते. माननीय कुलगुरू डॉ . सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ विजय खरे यांच्या उपस्थितीत श्रीमती उषा लक्ष्मण यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन झाले. याप्रसंगी प्रख्यात व्यंगचित्रकार चारुहास पंडित आणि पुरंदर प्रकाशन चे व्यवस्थापक श्री अमृत पुरंदरे यांनी लोकप्रिय ‘चिंटू’ चा ३८ पुस्तकांचा संच संग्रहालयाला भेट दिला. या मध्ये ६००० हुन अधिक चिंटूची व्यंगचित्रे आहेत.म्युझियम ऑफ कार्टून आर्ट च्या दुसऱ्या वर्धापन कार्यक्रमानिमित्त संग्रहालय परिसरात व्यंगचित्रकार आणि रेखाचित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. भारतातील विविध व्यंगचित्रकार, अर्कचित्रकार व कलाकार आपल्या कलाकृतीसह प्रदर्शनात उत्साहाने सहभागी झाले होते.
या व्यंगचित्र प्रदर्शनात सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार धनराज गरड, अतुल पुरंदरे, विश्वास सुर्यवंशी, शरयू फरकंडे, चैतन्य गोवंडे, शरद महाजन, गौतम दिवार , सुशील गुणवंते, अशा अनेक नामवंत व्यंगचित्रकारांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी व्यंगचित्रकला संग्रहालयाच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व विविध शैक्षणिक उपक्रम संग्रहालय मार्फत राबविल्या जाव्या अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय उषा लक्ष्मण यांनी संग्रहालयाच्या मांडणीचे कौतुक केले , विशेषतः व्यंगचित्र कलेचा इतिहास समजून घेण्यासाठी या संग्रहालयाला आवर्जून सर्वांनी भेट दिली पाहिजे असे मत व्यक्त केले . प्रसिद्ध व्यंगचित्रकार व म्युझियम ऑफ कार्टून आर्ट चे निर्माते आदरणीय श्री.सूरज ‘एस्के’ श्रीराम यांनी संग्रहालयाच्या पुढील वाटचालीं विषयी सांगितले. त्यांनी सर्व व्यंगचित्रकारांना संग्रहालयाच्या उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच आपण सर्वजण मिळून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचू शकतो अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. व्यंगचित्रकला संग्रहालयाच्या क्युरेटर डॉ. प्रिया गोहाड यांनी गेल्या एक वर्षात संग्रहालयाने केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. संग्रहालयाने वर्षभरात नियमित संग्रहालय भेट कार्यक्रम आयोजित केले. यासोबतच लहान मुलांच्या कार्यशाळा, व्यंगचित्र स्पर्धा, लाईव्ह कॅरिकेचर, व्यंगचित्रकारांचे प्रदर्शन असे अनेक उपक्रम आयोजित केले होते. संग्रहालयाच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून आता संग्रहालयातील काही चित्रांचे प्रदर्शन विविध शाळांमध्ये भरवण्याचे योजिले आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत ही व्यंगचित्रकला पोहचविता येईल.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी व्यंगचित्रकारांना प्रदर्शनात सहभागी झाल्याबद्दल विद्यापीठाचा मोमेन्टो भेट देऊन सन्मान करण्यात आला.तसेच याप्रसंगी व्यंगचित्रकार शरद महाजन, मनोर यांनी साकारलेले हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे अर्कचित्र म्युझियमचे प्रमुख आदरणीय श्री.सुरज ‘ एस के ‘ श्रीराम यांच्या सुपुर्द केले.कार्यक्रमाच्या शेवटी डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन च्या प्रमुख प्रा.माधवी रेड्डी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.