भरत शिरसाठ यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार जाहीर.
प्रतिनिधी – एरंडोल येथील भरत आत्माराम शिरसाठ यांना पद्मपाणी प्रतिष्ठान बीड मार्फत दिला जाणारा 2024 या वर्षाचा ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार” जाहीर झाला असून सदर पुरस्कार वितरण सोहळा 17 मार्च रोजी बीड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये संपन्न होणार आहे.भरत शिरसाट हे जे.एस. जाजू हायस्कूल उत्राण येथे कार्यरत असून ते दोन विषयांमध्ये नेट सेट उत्तीर्ण आहेत. ते मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेतून लेखन करीत असतात. भरत शिरसाठ यांचे आतापर्यंत नऊ पुस्तक प्रकाशित आहेत. यामध्ये ‘शिक्षक कसा असावा?’, ‘सत्यशोधक आणि इतर कथा’, ‘बकध्यान’ हा कवितासंग्रह, ‘खैरलांजी- भीमा कोरेगाव आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, ‘भारतीय संविधानाचे अनंत उपकार’ ‘एक्स्पेक्टेशन अँड चॅलेंजेस इन टीचिंग अँड लर्निंग इंग्लिश’ या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांचा समावेश आहे. ‘शिक्षक कसा असावा’ या पुस्तकाला संपूर्ण महाराष्ट्राची पसंती मिळालेली असून पहिली आवृत्ती संपून दुसरी आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्यांच्या पुस्तकांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस, प्रसिद्ध साहित्यिक डॉ.यशवंत मनोहर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य प्रकाशन समितीचे सचिव डॉ.प्रदीप आगलावे,प्रसिद्ध साहित्यिक प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांच्या प्रस्तावना आहेत.त्यांच्या पुस्तकांवर प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ,प्रदीप जाधव,प्रा. शुक्राचार्य गायकवाड आदी मान्यवरांनी समीक्षा लिहिलेल्या आहेत. प्रा. भरत शिरसाठ यांनी अनेक विषयांवर व्याख्याने दिलेली आहेत तसेच अनेक वैचारिक लेख लिहिलेले आहेत. वैचारिक लेखन असलेल्या पुस्तकांना व कविता संग्रहांना प्रस्तावना दिलेल्या आहेत. अनेक शैक्षणिक व सामाजिक स्मरणिकांचे संपादन केलेले आहे. तृतीय राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन जळगाव येथील ते स्वागताध्यक्ष होते. सदर साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे संपादन सुद्धा त्यांनी केलेले आहे. महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे माध्यमिक विभागाचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. समतावादी साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत. तसेच केंद्रीय बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे ते महासचिव आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.