काव्य हा सृजनशीलतेचा सुंदर अविष्कार… किरण मनूरे
एरंडोल – काव्य हा सृजनशीलतेचा एक सुंदर अविष्कार असून मुलांमध्ये कवितेतलं हे भावविश्व रुजवता आलं पाहिजे असे प्रतिपादन जवखेडे खुर्द चे जि प शिक्षक किरण मनोरे यांनी व्यक्त केले. ते येथील राष्ट्रीय साहित्य संघातर्फे आयोजलेल्या जागतिक कविता दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अरुण चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून लोहारा जि प शाळेचे शिक्षक टी एन पाटील, देवा महाजन, शिक्षक प्रवीण चव्हाण, शिक्षक खुशाल सरदार, संयोजक प्रवीण महाजन व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी रुचिका मराठे, मृणाल मनुरे, गुंजन बोरसे, बाविस्कर, गितेश चौधरी यांचे सह शिक्षक किरण मनूरे, शिक्षक खुशाल सरदार यांनीही कवितांचे वाचन केले. कवयित्री शांता शेळके, कवी मंगेश पाडगावकर, खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितांना उजाळा देण्यात आला. यावेळी जि प शिक्षक प्रवीण चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मुलांनी वेगवेगळे साहित्य वाचत आपली विचारशक्ती वाढवली पाहिजे, आपल्या कल्पनाशक्तीला वाव देत कवितेतलं सौंदर्य शिकून घेतलं पाहिजे तर खुशाल सरदार यांनीही राष्ट्रीय साहित्य संघाने शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतलेला साहित्यिक उपक्रम प्रेरक असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रम हा आनंद नगर मधील नगरपालिकेच्या पुस्तकांच्या बगीच्यात संपन्न झाला. सूत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रीय साहित्य संघाचे संयोजक प्रवीण महाजन यांनी तर आभार मृणाल मनोरे हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश दोडे, रेहांश मनुरे, मानस चौधरी आदींनी परिश्रम घेतले.