कर्तव्यतत्परता दाखविणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचा मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सत्कार
अमळनेर प्रतिनिधी : शहरात नुकतीच वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. यामुळे शहरासह अनेक गावांतील घरे, दुकाने,शेती उत्पादने व अनेक झाडे उन्मळून पडली, तसेच ताराही तुटल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे संपूर्ण जनजीवनावर मोठा परिणाम होऊन शहरवासीयांना पाण्यासह अनेकविध अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र याचवेळी शहरातील १३२ के. व्ही. क्षमता असलेल्या वीज उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी आपल्यातील कर्तव्यतत्परता दाखवत अतिशय कमी कालावधीत शहरातील पुरवठा सुरळीत करून शहरवासीयांचे जनजीवन पूर्वपदावर आणले.
या कामगिरीची मंगळग्रह सेवा संस्थेने गंभीरतेने दखल घेऊन आपण समाजाचे देणे लागतो, या सामाजिक जाणिवेचा पुनश्च प्रत्यय आणून देत मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने १७ एप्रिल रोजी संबंधित वीज उपकेंद्रातील कर्मचारी अनुक्रमे प्रशांत नेमाडे (अतिरिक्त कार्यकारी अभियंता), हेमंत सैंदाणे (सहाय्यक अभियंता, शहर कक्ष क्र. १), निलेश कुळसुंगे (सहाय्यक अभियंता, शहर कक्ष क्र. २), दीपक बि-हाडे, योगेश पाटील, आकाश वाडीले, हरी शेळके (चौघे वरिष्ठ तंत्रज्ञ), विवेक बि-हाडे (विद्युत सहाय्यक), प्रवीण चौधरी, नजीम खाटीक, निखिल पाटील, रुणाल पाटील (चौघे तंत्रज्ञ) व संतोष महाजन (चालक) यांचा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील व सचिव एस. बी. बाविस्कर यांच्यासह सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत यथोचित हृद्य सत्कार केला. त्यानंतर संबंधित सर्व वीज कर्मचाऱ्यांनी श्री मंगळग्रह मंदिरात श्रीरामनवमीनिमित्त आयोजित प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मदिन पूजास्थळी भेट देऊन दर्शनाचा लाभ घेतला. तसेच श्री मंगळग्रह देवतेचेही मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आकस्मिकपणे पार पडलेल्या या हृद्य सत्कार सोहळ्याने संबंधित वीज कर्मचारी भारावले.
कोट
मंगळ ग्रह सेवा संस्थेने आमचा केलेला सत्कार हा साक्षात ईश्वरीय आशीर्वाद आहे . येणाऱ्या काळात लोकसेवेसाठी या सत्कार्याची ऊर्जा आम्हास विशेष जोम व जोश देईल.
-टी. एच. नेमाडे
अतिरिक्त कार्यकारी अभियंता
राज्य वीज वितरण महामंडळ