बाळगोपाळांसाठी टॉय ट्रेन, जंपिंग नेट व बाउंसिंग मिकी- माऊसचे उदघाटन
मंगळग्रह सेवा संस्थेचा नावीन्यपूर्ण उपक्रम
अमळनेर : धार्मिकतेसोबतच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे बाळगोपाळांच्या विरंगुळासाठी एक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाचे संभाजीनगर येथील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलचे जनरल सर्जन डॉ. उन्मेष विद्याधर टाकळकर यांच्या हस्ते सपत्नीक उदघाटन करण्यात आले. यात टॉय ट्रेन, जंपिंग नेट व बाउंसिंग मिकी- माऊस या खेळण्यांचा समावेश आहे.
श्री मंगळग्रह मंदिरात रोज शेकडो भाविक दर्शन, पूजा, अभिषेकासाठी येत असतात. त्यांच्यासमवेत लहान मुलेही असतात. या मुलांचा विरंगुळा व्हावा, या उद्देशाने लहान मुलांचे आकर्षण असणाऱ्या टॉय ट्रेन, जंपिंग नेट व बाउंसिंग मिकी- माऊस ही खेळणी खुली करण्यात आली.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, तसेच संभाजीनगरचे महेशकुमार डाखोरकर यांच्यासह भाविक व बाळगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रम पार पडताच बाळगोपाळांनी या खेळण्यांचा मनमुराद आनंद लुटला. मंगळग्रह सेवा संस्थेने सुरू केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरावर स्वागत करण्यात आले.