एरंडोल विधानसभा मतदारसंघात एकूण ६८.७६ टक्के मतदान,सर्वत्र मतदान शांततेत पार पडले.
प्रतिनिधी – एरंडोल विधानसभा मतदार संघात एकूण २९८ मतदान केंद्रांवर २९३५५१ पैकी २०१८५१ मतदारांनी आपला मतदानाच्या हक्क बजावला. यात एकूण १५०५८१ पुरुष मतदारांपैकी १०४०७६ पुरुष मतदारांनी तसेच १४२९६० महिला मतदारांपैकी ९७७७० महिला मतदारांनी व इतर१० मतदारांपैकी ५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण ५८.३६ टक्के मतदान झाले असून यात महिला मतदारांची संख्या जास्त आहे.
दरम्यान आज दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीला सुरुवात झाली.सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. या दरम्यान सकाळी मतदार करणाऱ्यांची संख्या कमी होती.त्यानंतर दुपारी काही प्रमाणात मतदान केंद्रांवर गर्दी दिसून आली तसेच संध्याकाळी मात्र मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लक्षणीय मतदान केल्याचे दिसून आले.यावेळी उमेदवारांच्या प्रतिनिधी व स्वतः उमेदवार यांनी मतदान प्रक्रियत सहभाग नोंदवून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले. एरंडोल शहरातील पदमालय हायस्कूल येथील बूथ क्रमांक ४२ वर सामन्य नागरिकां सोबत रांगेत उभे राहून उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांनी सपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावला ते पाहून अनेक नागरिकांनी या बाबत त्यांच्या वागण्या विषयी कौतुक केले . तसेच भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे अध्यक्ष ॲड.किशोर काळकर ,अपक्ष उमेदवार अमित पाटील, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, रमेश परदेशी,दशरथ महाजन, रवींद्र महाजन, भारती महाजन राजेंद्र चौधरी , मीना चौधरी , जयश्री पाटील यांच्यासह शहरातील असंख्य सामाजिक राजकीय शैक्षणिक संस्थेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले.
मतदार संघातील काही ठिकाणी अपंगांकरिता व्हिलचेअर , पिण्याचे पाणी आरोग्य सुविधा तसेच बाहेर गावावरून आलेल्या मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील काही ठिकाणी हाल सहन करावे लागले.
एरंडोल विधानसभा मतदारसंघात एकूण १३ उमेदवार रिंगणात उभे होते. अधिकृत पक्षाचे तीन तर दहा अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत होते तसेच महाविकास आघाडी तर्फे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील महायुती तर्फे आमदार पुत्र अमोल पाटील तर स्वाभिमानी पक्षातर्फे इंजि. प्रशांत पाटील हे निवडणूक लढवत असून महाविकास आघाडीचे बंडखोर डॉ.हर्षल माने तर महायुती मधून बंडखोरी करत माजी खासदार ए.टी. पाटील,राष्ट्रवादी पक्ष अजित दादा गटाचे तालुकाध्यक्ष अमित पाटील हे बंडखोरी करून निवडणूक लढवत आहे.दरम्यान सुरुवातीपासून महाविकास आघाडी महायुती व अपक्ष उमेदवार भगवान पाटिल (महाजन) तसेच महाविकास आघाडी महायुती मधील बंडखोर यांनी लढतीमध्ये चुरस निर्माण केली होती.शेवटच्या दोन दिवसांमध्ये मात्र अपक्ष उमेदवार अमित पाटील,डॉ. संभाजीराजे पाटील,ए. टी.पाटील,डॉ.हर्षल माने यांचा जोर कमी दिसून आला. त्यामुळे मतदार संघामध्ये निरनिराळ्या चर्चांना उधाण आले आहे
तसेच शेवटच्या दोन दिवसात महायुतीचे उमेदवार अमोल पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सतीश पाटील, अपक्ष उमेदवार भगवान पाटिल (महाजन) यांनी मात्र आपल्या प्रचारात आघाडी घेतली.मतदार संघात तिरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात आहे.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विकासाचे मुद्दे कमी पण सामाजिक व धार्मिक मुद्द्यांना जास्त महत्त्व दिल्याचे दिसून आले व विकासाच्या मुद्द्याला मात्र बगल देण्यात आल्याचे दिसून आले.शेवटच्या दोन दिवसात मतदारांना लक्ष्मी दर्शन झाल्यामुळे निवडणुकीत जास्तच रंगत आल्याचे चित्र दिसून आले.निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे व त्यांचे सहकारी , गृहरक्षक दलाचे जवान,केंद्रीय राखीव पोलीस यांनी परिश्रम घेतले.