एरंडोल येथे शिवसेना शिंदे गटाचे अमोल पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी..

InCollage_20241124_134251099.jpg

प्रतिनिधी एरंडोल – एरंडोल विधानसभा निवडणुकीसाठी २३ नोव्हेंबर २०२४ शनिवारी सकाळी ८ वाजता म्हसावद रोडवरील इनडोअर स्टेडियम मध्ये मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला.दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी निवडणूकीचा निकाल घोषित केला.शिवसेना शिंदे गटाचे अमोल पाटील यांना १ लाख १ हजार १८८ मते मिळाली.तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी उमेदवार माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांना ४४ हजार ७५६ मते मिळाली.तर अपक्ष उमेदवार भगवान महाजन यांना ४१ हजार ३९५ मतांचा कौल दिला.विजयी उमेदवार अमोल पाटील यांनी ५६ हजार मतांची आघाडी घेतली.

इतर पराभूत उमेदवारांना मिळालेली मते.

डॉ.हर्षल माने – ६ हजार ३७३ मते
डॉ.संभाजीराजे पाटील – २ हजार ८४५
अमित पाटील – १ हजार ७०३
ए.टी.नाना पाटील – १ हजार ५७६
सुनील मोरे – ९७७
इंजि.प्रशांत पाटील – ५०४
इंजि.स्वप्निल पाटील -३७३
अण्णासाहेब सतीश पवार – २३९
अरूण जगताप -२०४
दत्तू रंगराव पाटील – १२६
नोटा मते – १५०९
      मतमोजणीसाठी एकूण २३ फेऱ्या झाल्या असून विशेष म्हणजे पहिल्या फेरीपासून अमोल पाटील यांनी आघाडी घेतली.त्यानंतर शेवटपर्यंत त्यांच्या आघाडीत  वाढ झाली.त्यामुळे त्यांना भरघोस मते मिळाली.मतमोजणी केंद्राबाहेर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची अलोट गर्दी दिसून आली.सतत अमोल पाटील यांच्या मताधिक्यात वाढ झाल्याचे लक्षात आल्यावर महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली.अमोल पाटील यांचा विजय निश्चित आहे हे कळल्यावर कार्यकर्त्यांनी बाहेर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष केला.निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार अमोल चिमणराव पाटील हे कार्यकर्त्यांसह मतमोजणी केंद्रावर दाखल झाले.निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा आमदार निवडीचे प्रमाण पत्र देण्यात आले.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा गजर करीत जल्लोष केला.अनेकांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करून अभिनंदनाचा वर्षाव केला.
      केंद्राबाहेर जे सी बी द्वारे आमदार अमोल पाटील यांच्यावर फुलांचा व गुलालाचा वर्षाव करण्यात आला.तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार अमोल पाटील यांना पुष्पहार देऊन त्यांचे अभिनंदन केले.त्यानंतर वाचत गाजत आमदार अमोल पाटील यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीची सांगता मरिमाता मंदिर परिसरात करण्यात आली.
      निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड, एरंडोल तहसीलदार प्रदीप पाटील, पारोळा तहसीलदार उल्हास देवरे, एरंडोल न.पा.मुख्याधिकारी अमोल बागुल, गटविकास अधिकारी दादाजी जाधव, निवडणूक नायब तहसीलदार एन.टी.भालेराव,इतर अधिकारी व कर्मचारी यांनी मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.मतदान केंद्रात सी आर पी एफ, एस आर पी एफ, पोलीस कर्मचारी, होमगार्डस् तसेच पोलिस निरीक्षक सतीश गोराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

About Author

You may have missed

error: Content is protected !!