पिंपळकोठे प्र.चा येथे ३६ तासापासून लाईट बंद…
एरंडोल:-तालुक्यातील रिंगणगाव नजीक असलेल्या पिंपळकोठा प्रचा या गावात वीजपुरवठा अभावी गेल्या तीन दिवसापासून अंधार आहे .या गावाची लोकसंख्या जवळपास साडेतीन ते चार हजार इतकी आहे.
गेल्या शुक्रवारी येथील विजेचा एक ट्रांसफार्मर जळाल्यामुळे अर्ध्या गावावर काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अंधारात असलेल्या गावातील लोकांनी ज्या भागात वीज पुरवठा सुरू आहे तेथून आकडे टाकून वीजपुरवठा सुरू केल्याचा अजब प्रकार सर्रास सुरू आहे
आकडे टाकून वीजपुरवठा घेतल्यामुळे एकाच ट्रांसफार्मर वर तान आल्यामुळे दुसरा ट्रांसफार्मर सुद्धा जळाला पर्यायने संपूर्ण गाव अंधारात गेले. जवळपास चार दिवस उलटले तरी वीज वितरण यंत्रणा व ग्रामपंचायत प्रशासन यांनी काही एक कार्यवाही केलेली दिसून येत नाही . दोन्ही यंत्रणांच्या भोंगळ कारभारांबद्दल प्रचंड नाराजी पसरली आहे. गावात वीज नसल्यामुळे सार्वजनिक पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे गावात लोकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. हिवाळ्याच्या दिवसात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याशिवाय गावातील पिठाच्या गिरण्या बंद असल्यामुळे शेजारच्या गावातून दळण दळून आणावे लागत आहे. फेब्रुवारी महिना तोंडावर असून या महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षा असतात त्यामुळे परीक्षाअर्थी विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम झाला असून सलग चार दिवसापासून विद्यार्थ्यांचे अभ्यासचे नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळी डास व मच्छरांचा हल्ला सुरू होतो. अशा अनेक समस्यांना ग्रामस्थ सामोरे जात आहेत तरी ग्रामपंचायत प्रशासनाने व वीज वितरण कंपनीने ग्रामस्थांचा अंत न पाहता लवकरात लवकर वीज ट्रांसफार्मर जोडून वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.