पाचवे अपत्य मुलगी झाल्याने निर्दयी आईने फेकले कालव्यात; अपहरण झाल्याचा केला होता बनाव

n468583892167554151516373458b82749a0e14044b1b5802d1c7427b7d202e51a8f0f2c45dc3d91c1ebabb.jpg

विशेष/प्रतिनिधी – आईच्या नात्याला काळिमा फासणारी घटना जुन्नर तालुक्यात घडली असून स्वतः आईनेच आपल्या पोटच्या बाळाला पिंपळगाव जोगा डाव्या कालव्यात फेकल्याची कबुली पोलिस तपासात दिली.

आळेफाटा पोलीस शनिवारी दिवसभर बाळाच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. परप्रांतीय महिलेने फेकलेले बाळ तिचे पाचवे अपत्य होते. नवजात बालिकेला नकोशी करणाऱ्या जन्मदात्या आईला सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ग्रामीण रुग्णालय आळे (जुन्नर) येथे नवजात मुलीला डोस देऊन घरी येत असताना अज्ञात इसमाने आईला धक्का देऊन तिच्या १५ दिवसांपूर्वी जन्मलेल्या नवजात मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ४) नगर-कल्याण महामार्गावर घडली होती.

मात्र, आज त्या घटनेमागचे सत्य समोर आले आहे. या १५ दिवसाच्या बाळाचे अपहरण झाले नसून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा येथे वास्तव्यास असलेल्या एका परप्रांतीय महिलेने शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास 15 दिवसापूर्वी जन्मलेल्या नवजात मुलीचे अपहरण झाल्याचा कांगावा करत आळेफाटा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.

मात्र, पोलिसांनी घटनेनंतर २४ तासांत निर्दयी आईचे बिंग फोडले. बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविताना महिलेने सांगितलेल्या घटनाक्रमामुळे पोलिसांना महिलेवर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी घडलेल्या घटनेपासूनचे सर्व सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी बालिकेच्या आईला ताब्यात घेत अधिक तपास केला. नवजात बाळाला पिंपळगाव जोगा डाव्या कालव्यात टाकल्याची कबुली आईने पोलिसांना दिली.

दरम्यान, पोलिसांकडून या महिलेची कसून चौकशी केली जात असून, पिंपळगाव जोगा डाव्या कालव्यात टाकलेल्या बाळाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. या महिलेने केलेल्या कृत्यामागे नेमके काय कारण आहे? याचा शोधही पोलिसांकडून घेतला जातो आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!