खडके बु. येथील लैगिंक अत्याचार प्रकरणी बालकल्याण समितीच्या अध्यक्षांसह तीन जणांविरुद्ध गुन्हा
एरंडोल : एरंडोल तालुक्यातील खडके बु. येथील बालगृहातील अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार प्रकरणाला धक्कादायक वळण लागले असून बालकल्याण समितीच्या अध्यक्षांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. गुरूवारी नव्याने तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण पुढे आले. या मुलींनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलींनी चार महिन्यापूर्वी बाल कल्याण समिती, संस्थेचे अध्यक्ष आणि तेथील शिक्षकांकडे तक्रार केली होती. परंतू यापैकी कुणीही दखल घेतली नसल्याने या सर्वावर गुरुवारी एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसात तीन अल्पवयीन पीडित मुलींनी दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणारा आरोपी गणेश पंडित याच्यासह बाल कल्याण समितीच्या बोरनारे मॅडम, देवयानी मॅडम, तळईचे शिक्षक प्रताप सर यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा देवयानी गोविंदवार (वय ४१) , सदस्या विद्या बोरनारे (वय ५१), सदस्य संदीप पाटील ( वय ४१) , शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादाजी उर्फ प्रभाकर यशवंत पाटील (वय ६०), तळई येथील शिक्षक प्रताप सर उर्फ प्रमोद पाटील (वय ३९) काळजीवाहक गणेश पंडित (वय३२) अशी असून त्यांच्यावर कलम ३५४ , ३७६ , ३२३ , ५०४ , ५०६ , पोस्को अंतर्गत ४ , ५ , ६ , ८ , ९ , १९ , २१ तसेच बाल अधिनियम ८२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
समितीच्या सदस्यांचे नोंदवले जाबजवाब !
पोलिसांनी या प्रकरणात गुरूवारी एरंडोल पोलीस ठाण्यात उपविभागीय अधिकारी सुनिल नंदनवार, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी बाल कल्याण समितीतील काही सदस्यांचे जाबजबाब घेतले. त्यानंतर आरोपी गणेश पंडित यांच्यासह मुलींच्या तक्रारीची दखल घेतल्याने संस्थेचे अध्यक्ष, शिक्षक आणि बाल कल्याण समितीतील अध्यक्ष व दोन सदस्या विरोधात गुन्हा दाखल केला.