लैगिक कामगार भगिनी यांना येणाऱ्या समस्या आणि कायदेशिर चौकटीवर चर्चा सत्र

IMG-20240807-WA0115

प्रतिनिधी – येथील हॉटेल मिड टाऊन येथे ७ रोजी लैंगिक कामगार भगिनी यांना येणाऱ्या समस्या आणि कायदेशिर चौकट या विषयावर एक दिवशीय चर्चा सत्राचे आयोजन नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स,संग्राम संस्था सांगली, स्वाधार महिला संघ, अमळनेर, आधार बहुउद्देशिय संस्था अमळनेर, आणि विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विधी सेवा प्राधिकरण चे सचिव न्या. सय्यद होते.
चर्चा सत्राचा मुख्य उद्देश १९ मे २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने लैंगिक कामगारांच्या अधिकारांच्या बाबतित निर्देश जारी केले आहेत. त्यात सेक्स वर्कर्सना संविधाना नुसार सन्मानाचे जीवन कसे जगता येइल ? या विषयी तपशिलवार शिफारसी केल्या आहेत. त्यांना लैंगिक कामगार भगिनी असे संबोधण्यात यावे असेही नमूद आहे.
यावेळी विधिसेवा प्राधिकरणचे जिल्हयातील वकील प्रतिनिधी, पोलिस अधिकारी, सेक्स वर्कर्स सोबत कार्य करणाऱ्या विविध सामाजिक संस्थां ,महिला व बालकल्याण विभाग ,लैंगिक कामगार ,जिल्हा एडस नियंत्रण कार्यालय ,मीडिया प्रतिनिधी सहभागी झाले होते.
ऍड.ललिता पाटील प्रांताधिकारी महादेव खेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर ,व्हॉइस ऑफ मीडियाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले विप्रो कंपनीचे एच.आर.मॅनेजर चेतन थोरात ऍड.शकील काझी ,पोलीस निरीक्षक विकास देवरे आधार संस्थेच्या डॉ. भारती पाटील व रेणू प्रसाद प्रमुख मार्गदर्शक होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश पुस्तिकेचे शिदोरी स्वरूपात टोपली उघडुन चर्चा सत्राचे उद्घाटन झाले.
आधार बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा डॉ.भारती पाटील यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश ,आधार आणि स्वाधार संघ यांचे सेक्स वर्कर महिलां साठीचे मागील २५ वर्षातील कार्याचा लेखाजोखा मांडला. सांगली येथील संग्राम संस्थेच्या प्रकल्पाधिकारी किरण शिंदे यांनी लैंगिक कामगारांच्या समस्या मांडल्या.
ऍड.ललिता पाटील यांनी सेक्स वर्कस महिलांच्या भल्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, विदारक सद्यस्थिती व सनदशीर तरदुदींची माहिती दिली.डॉ.डिगंबर महाले यांनी लैंगिक कामगारांच्या संदर्भात न्यायालयीन प्रतिबंध व कायदेशीर आणि सामाजिक दायित्वाच्या आचारसंहितेची माहिती दिली.
सुनील नंदवाळकर यांनी सेक्स वर्कर महिलांवर होणाऱ्या पोलीस कारवाईत न्यायालयीन निर्देशांची माहिती दिली . पोलीसांची समाजसेवक म्हणूनची भूमिकाही त्यांनी प्रभावीपणे मांडली. चेतन थोरात यांनी विप्रो कंपनी व्यवसायासोबत करीत असलेल्या भरीव सामाजिक कार्याची माहिती दिली.न्या.सय्यद यांनी विधी सेवा समितीचे एकूणच कार्य ,शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. महिलांनी रोजगाराभिमुख प्रशिक्षण घ्यावे. सन्मानाने जीवन जगण्यासाठी सक्षम व्हावे .कायदेविषयक मदत लागली जिल्हा विधी प्राधिकरणाशी संपर्क साधावा असे आवाहन केले. तीन लैंगिक कामगार भगिनींनीही मनोगतातून त्यांच्या समस्यांना वाचा फोडली.अमळनेर ,चोपडा व पारोळा येथील वकील संघ प्रतिनिधीनी त्यांच्या मांडल्या.
चर्चा सत्राला यशस्वी करण्याकरिता जिल्हा विधी सेवा समितीचे सुभाष चंद्र पाटील, जावेद पटेल ,प्रा. विजय कुमार वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.
सूत्र संचालन आधार संस्थेचे दिपक संदानशिव यांनी केले . रेणु प्रसाद यांनी आभार मानले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!