एका हातात मोबाईल तर दुसऱ्या हातात रिमोट हीच आमची संवादाची साधने आहेत का ? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांचा एरंडोल येथील कार्यक्रम प्रसंगी सवाल …..
एरंडोल:- एका हातात मोबाईल व दुसऱ्या हातात रिमोट हीच आमची संवादाची साधने आहेत का ? यातून सूजान नागरिक कसे तयार होणार ? असा अंतर्मुख करणारा सवाल राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी येथे केला. यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डी. डी. एस. पी. महाविद्यालयात बुधवारी १८ सप्टेंबर २०२४ रोजी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी युवतींशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार हे होते.
प्राध्यापक व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना एखादा धडा किंवा प्रकरण शिकवायचे राहू द्या; त्या ऐवजी आयुष्यात संघर्षाची लढाई कशी लढावी हे युवतींना शिकवण्याची गरज आहे असे प्रतिपादन चाकणकर यांनी केले.
समाजाची मानसिकता बदलली पाहिजे असे मत व्यक्त करून त्यापुढे म्हणाल्या की, मातृत्वाचा सन्मान एका मातेला मिळाला पाहिजे. आपल्याला विकृत मानसिकते विरुद्ध लढा द्यायचा आहे. अंधश्रद्धेच्या घटनांना पायबंद घातला पाहिजे. सुजान नागरिक तयार झाले पाहिजे. बालविवाह संदर्भात समाजाची मानसिकता बदलणे काळाची गरज आहे. आईने बालविवाहाला विरोध केला पाहिजे. सायबरच्या माध्यमातून मुलींना ब्लॅकमेल करण्याच्या घटना घडत आहेत. आई बापांची स्वप्ने मुलींनी पूर्ण करायची आहेत. सायबर क्राईम मध्ये मुली मोठ्या प्रमाणात अडकल्या जातात. या प्रकारात पालकांची सुद्धा मोठी जबाबदारी आहे.
प्रारंभी संस्थापक संस्थाध्यक्ष कै. दि.शं पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर रूपालीताई चाकणकर व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन चाकणकर यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर रूपालीताई चाकणकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, अमित पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष योगेश देसले, कल्पना पाटील, अभिलाषा रोकडे, संस्थेचे संचालक संजय पाटील, उपाध्यक्ष ॲड. आनंदराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत पाटील, डॉ. सुरेश पाटील, जयश्री पाटील, मोनालीका पवार ,अरविंद मानकरी, किशोर पाटील, वर्षा पाटील, विमलबाई पाटील, अश्विनीताई मोगल, डॉ.स्वाती शेलार , प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, उप प्राचार्य डॉक्टर अरविंद बडगुजर , प्रा. एन. ए .पाटील, एस. जे. पाटील, गजानन पाटील, डॉ. शरद पाटील व मान्यवर उपस्थित होते.
संस्थाध्यक्ष अमित पाटील यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मीना काळे व प्रा. डॉ. राम वानखेडे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. रेखा साळुंखे यांनी केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विशेष हे की महिलांनी सुद्धा चाकणकर यांना काही प्रश्न विचारले.
रूपालीताई चाकणकर यांनी युवतींशी संवाद साधला असता युवतींनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे देण्यात आली. तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी सुद्धा युवतींशी संवाद साधून त्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
आमचं काय…….?
रूपालीताई चाकणकर यांनी युवतींशी हितगुज केल्यावर, विद्यार्थ्यांना सुद्धा शंका विचारण्याचे आवाहन केले. त्यावेळी एका विद्यार्थ्याने मुलींसाठी मोफत शिक्षण व मोफत एसटी पास आणि आता लाडकी बहीण योजना अशा योजनांचा लाभ दिला जात आहे. महिला व मुलींनाच न्याय देण्याविषयी आमची तक्रार नाही, पण आमचे काय ? आम्हाला न्याय कधी मिळणार? शासन आमच्यासाठी लाडका भाऊ योजना कधी आणणार ?असे म्हटल्यावर एकच हास्य पिकला.